Eye Witness |आय विटनेस Author: Ranga Date |रंगा दाते
शेतकरी कुटुंबात जन्मलेले आणि कृषितज्ज्ञ असलेले दाते हे सराईत लेखक नसले तरी उत्तम लेखकाचे गुण त्यांच्या ठायी दिसून येतात. प्रस्तुत कादंबरीत गुन्हेगारी जगतातील वास्तव उघड करण्याचा प्रयत्न केला आहे. दहशतवाद, तस्करी आणि त्यातून घडणारे गुन्हे यांचे सावट फक्त मोठ्या शहरांवरच नाही तर लहान खेड्यांनाही त्याचे चटके सोसावे लागतात. गुन्हेगाराच्या अपप्रवृत्तीततून घडलेला गुन्हा आणि त्यात भरडला जाणारा कुमारवयीन मुलगा; जो गुन्ह्याचा ‘प्रत्यक्ष साक्षीदार’ असतो, त्याची झालेली फरफट आणि त्याचबरोबर त्याच्या कुटुंबाची झालेली परवड यांचे वर्णन कादंबरीत आहे. पण समाजात या दुष्प्रवृत्ती जरी प्रकर्षाने दिसून येत असल्या तरी नाण्याच्या दुसर्या बाजूप्रमाणे समाजातील सत्प्रवृत्तीचेही दर्शन या कादंबरीत आपल्याला घडते. नातेगोते, ओळख पाळख नसतानाही केवळ माणुसकीच्या दृष्टीने समाजातील अनेक लोकांकडून कादंबरीतील बाल नायकाला मिळणारे प्रेम आपुलकी व संरक्षण आपल्याला स्तिमित करते. वास्तवता आणि वाचनीयता व भाषेतील प्रवाहीपणा यामुळे ही कादंबरी वाचकाला खिळवून ठेवते.