Ethics Integrity & Aptitude | नितीतत्वे, प्रामाणिकपणा आणि मानसिक कल
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सनदी सेवेच्या मुख्य परीक्षेला २५० गुणांसाठी सामान्य अध्ययन क्रमांक ४ Ethics, Integrity & Aptitude हा पेपर सक्तीचा आहे. मराठी माध्यमातून परीक्षेची तयारी करणार्या परीक्षार्थींना मराठीत या विषयावर पुरेसे संदर्भ लवकर मिळत नाहीत आणि इंग्रजी वा हिंदी भाषेतील संदर्भ ग्रंथाचा मराठीत अनुवाद करताना त्यांचा मोलाचा वेळ वाया जातो. विद्यार्थ्यांची ही निकड लक्षात घेत मराठी साहित्यिक, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मराठी वाड्मय विषयाचे आवडते प्राध्यापक आणि विचारवंत डॉ कमलेश सोमण यांनी ५०४ पानी नितितत्वे, प्रामाणिकपणा आणि मानसिक कल या वर एक मार्गदर्शक पुस्तिका लिहिली आहे. डॉ. कमलेश सोमण यांनी महेश एलकुंचवार यांच्या नाटकांवर PhD केली असून गेली ४० वर्ष ते मराठी वाड्मय या विषयाचे अध्ययन आणि वैचारिक लिखाण करत मराठी सारस्वताची अविरत सेवा करत आहेत. १९९४ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी मराठी वाङ्मय हा माझा ऐच्छिक विषय होता आणि त्यासाठी मला डॉ. कमलेश सोमण यांच्यासारखा सकारात्मक विचारवंत गुरू भेटला व भारतात दुसर्या क्रमांकाचे, मराठी वाङ्मय विषयासाठी गुण प्राप्त करत मी IPS झालो. माझ्या यशात कमलेश सरांचा मोलाचा वाटा आहे. मराठी माध्यमातून मी केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा लिहिल्याने मराठीतील संदर्भ ग्रंथाचा अभाव, इंग्रजी वा हिंदी भाषेत उपलब्ध असणार्या संदर्भाची मराठी अनुवाद करताना नेमके पर्यायी शब्द न आठवणे आणि त्यामुळे येणारा तणाव, हे सर्व मी स्वतः अनुभवले आहे
चाळीस वर्षात अध्ययनाच्या जोडीला आचार्य रजनीश, जिद्दू कृष्णमूर्ती, संत आणि विचारवेत्ते यांच्या साहित्याचे डॉ. कमलेश सोमण सरांनी सखोल वाचन केले आहे, याचा या ५०४ पानी पुस्तिकेत पानोपानी आपल्याला त्याचा प्रत्यय येतो.
गेल्या काही वर्षातील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सामान्य अध्ययन पेपर चार मध्ये विचारलेल्या प्रश्नांची आदर्श किंवा अपेक्षित उत्तरे देखील डॉ. कमलेश सरांनी या पुस्तिकेत लिहिली असल्याने परीक्षार्थींना हे पुस्तक खूप मोलाचे ठरणार आहे
मराठी माध्यमातून तयारी करणार्या आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सनदी सेवा स्पर्धेतून आपले उज्वल भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सर्व होतकरू विद्यार्थ्यांनी हे पुस्तक जरूर आपल्या संग्रही ठेवावे.
डॉ कमलेश सोमण यांचे सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने, त्यांचा मुलाखतीच्या तयारीसाठीचा मार्गदर्शक या नात्याने मनपूर्वक आभार!