Skip to product information
1 of 2

Payal Books

Devajicha Office By James Joseph Translated By Sunita Katti

Regular price Rs. 216.00
Regular price Rs. 240.00 Sale price Rs. 216.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
" नोकरी करणाऱ्या विशेषत: मोठ्या पदावर नोकरी करणाऱ्या लोकांचा बराचसा वेळ ऑफिसच्या कामात जातो. त्यात ऑफिसमध्ये जाणं आणि परत घरी येणं या वेळेचाही समावेश असतो. ऑफिस घरापासून लांब असेल, तर जाण्या-येण्यात माणूस दमून जातो. त्याला कुटुंबासाठी वेळ देता येत नाही. तो अन्य कोणत्या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकत नाही; पण घरात बसून जागतिक दर्जाच्या कंपनीबरोबरही किती सहजपणे काम करता येतं, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे – ‘देवाजीचं ऑफिस’ हे पुस्तक. जेम्स जोसेफ यांनी या पुस्तकाद्वारे स्वत:चे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. इंग्लंडसारख्या ठिकाणी शिक्षण घेऊन, इंग्लंड, अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये चांगल्या कंपनीत उच्च पदावर काम केल्यानंतर जोसेफ यांना भारतात केरळमध्ये आपल्या मूळ गावी परतावे, असे वाटू लागले. म्हणून त्यांनी त्यासाठी काय पूर्वतयारी केली, आपल्या छोट्याशा गावातून त्यांनी काम कसे सुरू केले, त्यात येणाऱ्या अडचणी गृहीत धरून त्यावर मात करण्यासाठी काय उपाययोजना केल्या, त्यांच्या निसर्गसंपन्न गावातील त्यांचं दैनंदिन, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक जीवन कसं आहे इ. बाबींचं निवेदन जोसेफ यांनी या पुस्तकातून केलं आहे. हे पुस्तक म्हणजे तंत्रज्ञानाच्या युगात स्वत:चं भावविश्व कसं जपावं आणि ते व्यापक कसं करावं, याचंही जाता जाता मार्गदर्शन करून जातं. जोसेफ यांची पत्नी डॉक्टर आहे. त्यामुळे तिला व्यवसायाबरोबरच सेवाभावही जपता येतो. त्यांच्या पत्नीची डॉक्टरीची पदवी परदेशातील असल्यामुळे भारतात प्रॅक्टिस सुरू करण्यात तिला आलेले अडथळे आणि त्या अडथळ्यांवर जोसेफ यांनी केलेली मात, याचाही उल्लेख या पुस्तकात आला आहे. त्यांच्या मुलींचं शालेय जीवन, जोसेफ यांचं कौटुंबिक जीवन याचंही अगदी हलक्याफुलक्या शैलीत ते वर्णन करतात. त्यांच्या कामाच्या संदर्भातील जे जे उल्लेख या पुस्तकात आले आहेत, त्यावरून एकच गोष्ट लक्षात येते, की घरातून काम करताना ते कुठेही ढेपाळत नाहीत. उलट त्यांचा कामाचा वेग वाढलेला आहे. घरातून काम करताना कोणत्या गोष्टींची दक्षता घ्यावी, घरातून काम करतानाही आपल्या सहकाNऱ्याशी कसं जोडलेलं रहावं, याबद्दलही ते सांगतात. प्रगत तंत्रज्ञानामुळे जगभरातील लोकांशी बसल्या जागी संपर्क साधून काम कसं करता येऊ शकतं, हे या पुस्तकावरून समजतं. घरातून काम करतानाही ऑफिसइतक्याच कार्यक्षमतेने काम केलं पाहिजे, असा मूलमंत्रही या पुस्तकातून मिळतो. एकूणच, घरातून काम करतानाचं तुमचं व्यावसायिक जीवन आणि कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक जीवन कसं असतं, याचं अगदी साध्या, सोप्या भाषेत निवेदन या पुस्तकात केलं आहे. मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्याना (विशेषत: मॅनेजर लेव्हलच्या) अशी घरातून काम करण्याची सोय उपलब्ध करून दिली, तर परदेशस्थ भारतीय परत भारतात येऊ शकतात, अशी सूचनाही जोसेफ यांनी केली आहे. जोसेफ यांनी या पुस्तकात सुरुवातीला नमूद केलं आहे, ‘मोठा मासा बनून मोठ्या जलाशयात राहणं आणि लहान मासा बनून लहान तलावात राहणं, या दोन्ही गोष्टी मनाला सारखंच समाधान देतात. पहिली गोष्ट आपल्या व्यावसायिक बुद्धीला आव्हान देऊन संतुष्ट करते आणि दुसरी गोष्ट आपल्या भावनाप्रधान मनाला संतुष्ट करते.’ या दोन्ही गोष्टींचा उत्तम समन्वय जोसेफ यांनी साधला आहे आणि त्यांच्यासारखं काम करणाऱ्यासाठी ते एक उदाहरण आहेत. "