Skip to product information
1 of 2

Payal Books

Daryadil Darashikoh दर्यादिल दारा शिकोह By Kaka Vidhate

Regular price Rs. 700.00
Regular price Rs. 780.00 Sale price Rs. 700.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications
दर्यादिल दारा शिकोह - या थोर शहाजाद्याच्या जीवनाचा विस्तृत पट मांडणारी ही ऐतिहासिक कहाणी

दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सर ( भाऊ) म्हणत की, शहाजहान नंतर ‘औरंगजेबाच्या’ ऐवजी दिल्लीच्या तख्तावर ‘दारा शिकोह’ हा जर मुघल बादशहा झाला असता तर हिंदूस्थान चा इतिहास वेगळाच असता.
मांडे सरांनी सांगण्याच्या पूर्वी ‘दारा शिकोह’ नाव कधी ऐकले सुध्दा नव्हते.
आताही ‘दारा शिकोहची’ ओळख औरंगजेबाचा थोरला भाऊ म्हणूनच करून द्यावी लागेल.
या पुस्तकात ‘दारा शिकोह’ नेमका कसा होता? त्याचा अभ्यास, त्याचं साहित्यिक योगदान, त्यानं केलेल्या लढाया, विद्वानासोबत त्याची झालेली विविध धर्मावरती चर्चा, औरंगजेबाने त्याला काफ़िर म्हणून केलेला पाठलाग, शेवटी हालहाल करून केलेला त्याचा खून, ह्या सगळ्याची माहिती तिथल्या सगळ्या भौगोलिक परिस्थितीसह लेखकाने अतिशय चांगल्याप्रकारे दिली आहे.
अगदी कोवळ्या वयातच शिकोहने मुघल तख्तासाठीचे रक्तरंजित राजकारण पाहिलं होतं.
बापाने (शहाजहानाने) स्वत:च्या सख्खा भावांचा व त्यांच्या मुलांचा खून करून मुघलांच्या तख्त बळकावून स्वत: राज्याभिषेक करून घेतलेला पाहिला होता.
कालपरवापर्यंत सोबत खेळणाऱ्या चुलतभावांचा खून करताना आजोबांना (आईचे वडील) पाहिले.
या सगळ्या घटनांचा खोल परिणाम दारा शिकोह वरती झाला.
पुस्तक वाचताना सुरूवातीला या मुघल घराण्याची नाती समजून घेताना खूप गोंधळ उडतो. यासाठी सगळ्यात शेवटी दिलेली मोगलांची वंशावळ नीट पाहिल्यावर बऱ्यापैकी समजून येतं.
या पुस्तकात वातावरण निर्मिती साठी खूप साऱ्या उर्दू व फारसी शब्दांचा वापर केला आहे यासाठी पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या ‘परिशिष्ट ४’ वरती या शब्दांचे अर्थ दिले आहेत त्याचा उपयोग होतो.
तसेच ‘परिशिष्ट ५’ वरील या कादंबरीतील मुख्य ऐतिहासिक व्यक्तीरेखा व त्यांचा एकमेकांशी संबंध खूप चांगल्याप्रकारे दिला आहे. तो अगोदरच वाचून घेतल्यास पुस्तक वाचायला गती येते.
सर्व ऐतिहासिक व्यक्तीरेखा, त्यांचे संवाद, अवतीभवतीचे वातावरण यासगळ्यांचे वर्णन लेखकाने अतिशय ताकदीने केले आहे.
विशेषतः एखादा प्रसंग जर संगीत, गाणे, नृत्य याविषयी असेल तर मग त्या विषयी अतिशय बारकाईने लिहिले आहे. गाणे, गायकी, त्यातील राग -उपराग यांचे वर्णन जरा जास्तच आहे.
तसेच या पुस्तकाच्या मुख्य नायका विषयी लिहित असताना त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या बाकीच्या व्यक्तीरेखा आणि त्यांचा इतिहास ही खूप सांगितला आहे.
उदा. दारा ज्यांना गुरुस्थानी मानत अशा सुफी संत सरमद हे मुळ कोण होते? ते नग्न का राहायला लागले? त्यांचा शिष्य कोण? तो मुळचा कुठला?
परंतु हे सगळं वाचत असताना मुळ विषय कुठं भरकटत नाही. वाचण्याऱ्याला एकदम गुंतवून ठेवतो.
दारा शिकोहचा अभ्यास इस्लाम, कुराण याचा जितका होता तितक्याच ताकदीचा अभ्यास हा हिंदू, ख्रिश्चन या धर्माचा व त्यांच्या धर्मग्रंथाचा होता.
‘सत्याला जवळ घेऊन जातो’ तोच खरा धर्म ही शिकोह ची धारणा होती.
बादशाह शाहजहानशी सल्ला मसलत करताना तो नेहमी म्हणत की, इथं राज्य करायचं असेल तर धर्ममार्तंड उलेमांच्या सल्ल्यानुसार करून चालणार नाही तर ते सर्व सामावेशक असलं पाहिजे.
म्हणून तर भर दरबारात त्याने सगळ्यांना कर्मठांचा तीव्र विरोध पत्करून काशीच्या पंडितांच्या बाजूने अभिप्राय दिला. इस्लाम आणि हिंदू धर्मांची अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी करत शहाजहान ला हिंदू वरील बरेचशे कर माफ करायला लावले.
शिकोहच्या तीन बायकांची माहिती या पुस्तकात दिली आहे.
पहिली आहे ‘नादिरा बानू बेगम’ ( चुलत बहीण), दुसरी ‘जुलैखा उदेपुरी’ ( डचांनी एक गुलाम म्हणून विकली होती, ख्रिश्चन, शिकोहला ठार केल्यावर औरंगजेबाने हिच्या सोबत लग्न केले.) तर तिसरी ‘रानादिल’ ( नर्तकी सितारा हिने सांभाळलेली रजपूत मुलगी)
म्हणजे तिन्ही धर्मातील मुली हा शिकोहच्या बेगम होत्या.
विविध धर्मातील अनेक विचारवंताशी चर्चा, अनेक पुस्तकांचे वाचन, अनेक संत महात्मांशी पत्र व्यवहार यातून दारा शिकोह ची एक विशिष्ट अशी वैचारिक बैठक पक्की झाली होती.
दारा शिकोह एका ठिकाणी म्हणतात की, ‘सगळ्या ज्ञानाचं सार हे उपनिषदात सापडत.’ म्हणून त्याने उषनिषद, गीता यासह अनेक हिंदू ग्रंथाचे फारसीत भाषांतर केले. तसेच अनेक फारसी ग्रंथ संस्कृतमध्ये भाषांतरीत केले.
दारा शिकोह व हिंदू साधू बाबालाल या दोघांत धर्माविषयी झालेल्या चर्चेवर मुकालमा -ई- बाबालाल वा दारा शिकोह ( बाबालाल से बातचीत) हा ग्रंथ लिहिला गेला.
दारा शिकोहचा इतर धर्माविषयी असलेला ओढा विशेषतः हिंदू धर्म व धर्मग्रंथावरील अभ्यास या सगळ्या गोष्टींमुळे औरंगजेब त्याला काफ़ीर म्हणायचा.
तलवार घेऊन अगदी काबूल कंदाहार पर्यंत रणांगण गाजवणारा शिकोहची कलम मी तितकीच वेगाने चालायची.
राजकारण अन् रणांगण यातून मिळालेला बराचसा वेळ तो वाचन, लिखाण, अनेक धर्मातील ज्ञानी पंडितासोबत चर्चा यातच जात असे.
सहिष्णू, विद्वान, ज्ञानोपासक, विचारवंत शिकोहला वाटायचे की, ‘या राज्यात शांतीचे नंदनवन व्हावे.’
अशा शिकोहला अत्यंत पाताळयंत्री, धोकेबाज, कडवा धर्मवेड्या औरंगजेबाने जंग जंग पछाडले. अन् या राजकारणाच्या पटलावर नियतीने असा काही खेळ केला की, ‘ज्यानं फकीर सुध्दा व्हायची लायकी नव्हती त्याला मुघलांचे तख्त मिळाले. आणि ज्याला खऱ्याअर्थाने तख्त मिळाले पाहिजे होते त्याच्या नशिबी वणवण भटकंती आणि शेवटी क्रुर असं मरण आलं.
औरंगजेबाच्या डोक्यात जे काही आहे तेच तो घडवून आणत असे, मात्र या सगळ्याला तो धार्मिक रंग देत असे.
दारा शिकोहला पकडल्यानंतर औरंगजेब ठरवतो की, ‘शिकोह इस्लामच्या विरोधात वागला अन् इस्लाम विरोधात वागणाऱ्याला शरीयत नुसार हालहाल करून ठार मारले पाहिजे.’ हा प्रसंग तर अतिशय थरारक असा लिहिला आहे.
ज्या मरणयातना औरंगजेबाने आपल्या सख्ख्या मोठ्या भावाला दिल्या आहेत त्या वाचून तर अंगावर काटा येतो.
२९ ऑगस्ट १६५९ ला दारा शिकोह ला अतिशय मळकट अशी कपडे घालायला दिली. घाणीने बरबटलेल्या एका मरतुकड्या हत्तिणीच्या पाठीवर लाकडी हौद्यात त्याचा मुलगा ‘सिपिहार शिकोह’ (याला पुढे औरंगजेबाने जावाई करून घेतले) भर शहरात अतिशय अपमानास्पद अशी धिंड काढण्यात आली. ही धिंड बघणाऱ्या प्रत्येकाच्या अंत:करणाला दु:खाचा पाझर फुटला होता. प्रत्येकजण ऊर बडवून रडत होता. प्रत्येकजण औरंगजेबला शिव्या शाप देत होता.
धिंड झाली त्याच रात्री त्याने आपली बहीण रोशन आरा, मामा शाहिस्तेखान, हकीम तकर्रूबखान, बहादुर खान आदी लाचारांची चांडाळ चौकडी घेऊन दुसऱ्या दिवशी दाराला ठार मारायचं ठरवलं. पण मौत किती भयानक असली पाहिजे याची ती चर्चा होती.
या चर्चेत एकजण म्हणाला की, “जोगी, ब्राह्मण यांना मानत होता म्हणून तो धर्मभ्रष्ट कसा होईल? दुसऱ्या धर्माचे ग्रंथ पवित्र मानावेत का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हे सगळं असलं तरी दाराची इस्लाम वरतीची श्रद्धा कधी कमी झाली नाही. तो फक्त धर्मात खरे काय आहे तेच सांगत होता. ‘प्रभू’ अक्षरं कोरलेली अंगठी तो घालत होता, परंतु ‘रब्बुल आलमीन’ चे संस्कृत भाषांतर म्हणजे प्रभू. या दाराला काफ़िर म्हणता येत नाही.” यावर औरंगजेब म्हणाला, ” तो शरियतपासून दूर गेलेला काफ़िर आहे. एकेश्वरवाद न मानणारा तो एक ढोंगी आहे. इतर धर्मातील विद्वानांशी दोस्ती करून धर्म बाटवला आहे. आणि तो जिवंत राहिला तर इस्लाम नक्कीच खतऱ्यात येईल. म्हणून दीन आणि शरियतच्या भल्यासाठी काफ़िर दाराला त्वरीत सजा-ए-मौत द्यावी.” दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३० ऑगस्ट १६५९ ला औरंगजेबाने नजरकुल बेग या आपल्या क्रुर चेल्याला दारा शिकोहचे मुंडके कापून आणायला सांगितले. आणि नजरकुली गेल्यावर शफीखानला सांगितले की नजरकुल बेग वरती लक्ष ठेव. त्या दिवशी संध्याकाळी दारा शिकोह आपल्या १३-१४ वर्षांचा मुलगा ‘सिपिहार’ साठी चुल पेटवून स्वयंपाक करत होता. तितक्यात दगड काळजाचा नजरकुली तिथं आला. त्यांने बापला घट्ट मिठी मारून बसलेल्या सिपिहार अक्षरशः ओढून काढले. मोठमोठ्याने रडत असलेल्या सिपिहारला शेजारच्या खोलीत डांबून टाकले. आणि इकडे दारा शिकोहला सगळ्यांनी मिळून धरले व खाली पाडून त्याच्या छातीवर पाय ठेवून नजरकुलीने एखाद्या बकऱ्याचं मुंडकं कापावं तसं शिकोहच्या गळ्यावर खंजीराचं पात चालवलं अन् एका झटक्यात मुंडकं धडापासून वेगळं केलं.
हे मुंडकं तबकात घेऊन तो औरंगजेबाकडे घेऊन गेला. परंतु संशयी औरंगजेबाने रक्ताने माखलेले ते मुंडकं पाण्याने धुऊन आणायला सांगितले आणि नीटपणे न्याहाळत खात्रीकरून घेतली की ते मुंडकं दारा शिकोहचेच आहे ते. अशा ह्या कपटी, संशयी, अति धर्मवेड्या, पाताळयंत्री औरंगजेबाने अतिशय विद्वान व शूर अशा आपल्याच भावाचा निघृण खून केला अन् इथंच हिंदूस्थानच्या इतिहासाला एक वेगळेच वळण लागले.