Darpan | दर्पण Author: Kishor Medhe | किशोर मेढे
मराठी कवितेला अन्य भारतीय भाषांमधील काव्यानुभवाशी जोडून देणारा एक सेतू म्हणजे हा कवितासंग्रह. हिंदीमध्ये कविता लिहिणारे गुलज़ार आणि जावेद अख्तर, संतालीसारख्या जनभाषेतून काव्यानुभव व्यक्त करणार्या निर्मला पुतुल आणि तिबेटसारख्या पीडित क्षेत्राच्या व्यथा काव्यबद्ध करणारे ल्हासंग सिरींग यांच्या निवडक कवितांचे हे मराठी अनुवाद आहेत. किशोर मेढे यांनी अत्यंत संवेदनशीलतेने या परभाषिक भारतीय काव्याशी या अनुवादातून हृदयसंवाद साधला आहे आणि त्या काव्यानुभवाला मराठी परिवेशात यथातथ्यपणे सादर केले आहे. वेगळ्या भाषांतून काव्यलेखन करणार्या या भारतीय कवी-कवयित्रींचे अनुभव एकाच आंतरिक चेतनेने स्पंदन पावत आहेत; याचा प्रत्यय या काव्यानुवादातून येतो. या कवी-कवयित्रींच्या वेदनेची आर्तता आपल्याला ओळखीची वाटते. व्यक्तीच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा घेतलेला शोध, भोवतालच्या जगातील दडपणांमुळे होणारी घुसमट, स्वातंत्र्यासाठी फोडलेला टाहो, जीवनाने हाती दिलेले विदारक सत्य या सगळ्या प्रक्षेपणांमध्ये आपल्याला आपली ओळख नव्याने प्रतीत होते. याचे श्रेय किशोर मेढे यांच्या सक्षम आणि सर्जनशील अनुवादाला आहे. मराठी कवितेला अन्यभाषिक भारतीय कवितेच्या अंतरंगाची संवेद्य प्रतीती घडविण्याच्या दृष्टीने; आणि पर्यायाने मराठी कवितेला समृद्ध करण्याच्या दृष्टीने हा काव्यसंग्रह अतिशय लक्षणीय आणि महत्त्वपूर्ण आहे. - प्रा. डॉ. निशिकांत मिरजकर