डॉ. अशोक राणा यांचे 'दैवतांची सत्यकथा' हे महत्त्वाचे पुस्तक तुमच्या समोर येते आहे. खरं तर त्याला ग्रंथ म्हणायला हवं. कारण, यातील जे संशोधनात्मक लेख आहेत, ते येथील लोकसंस्कृती, लोकधारणा, लोकसमजुती, लोकश्रद्धा आणि लोकव्यवहार यांचा परिपाक आहेत. प्रचलित लोकधारणा आदिम संस्कृतीपर्यंत कशा जातात आणि त्या आधारे गैरसमजुतींची पुटे कशी दूर होतात, हे तपासणे अत्यावश्यक आहे. खरं तर एके काळच्या निखळ सत्यावर अंधश्रद्धांची पुटे चढत असतात. त्यामुळे मूळ सत्याचा अधिक्षेप होतो. लोकदैवतांच्या बाबत असंच घडतं. इथलेच पराक्रमी पूर्वपुरुष लोकांची श्रद्धास्थाने बत आणि नंतर 'लोकदैवत' म्हणून प्रतिष्ठा पावतात. आर्यपूर्व काळातील बहुतेक लोकदैवतं अशीच आहेत; पण कालांतराने येथे संस्कृती-संघर्ष झाला आणि दैवतांची पळवापळवी, मोडतोड, विलीनीकरण असले प्रकार घडत गेले. त्यातून मूळ दैवतापर्यंत जाण्यासाठी पाश्चात्त्य ज्ञानावर परपुष्ट झालेली दृष्टी उपयोगाची नसते; तर त्यासाठी भारतीय लोकधारणांचे ज्ञान आणि लोकश्रद्धांची शक्तिकेंद्रे माहीत असणे अनिवार्य असते. डॉ. राणांची चिकित्सक वृत्ती आणि मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न सर्वच लेखांमध्ये प्रकर्षाने जाणवतो.
Share
Choosing a selection results in a full page refresh.