प्रयत्न हीच ज्यांची आत्मशक्ती होती, त्या विश्वामित्राची कथा विलक्षण आहे. क्षात्रशक्तीचे बळ असलेल्या विश्वामित्रांचा जीवनप्रवास हा राजर्षी, पुढे महर्षी, व नंतर ब्रह्मर्षी असा चढत्या क्रमाने झाला आहे.
हा प्रवास सहजसाध्य नव्हता. ह्या प्रवासात राग, लोभ, मोह, माया, काम, क्रोध, मान-अपमान अशा शत्रूंमुळे अडथळे निर्माण झाले किंवा केले गेले. कठोर तपश्चर्येची प्रतिज्ञा करण्याची व ती प्रतिज्ञा तडीस नेण्याची अफाट आत्मशक्ती त्यांनी प्राप्त करून घेतली. प्रतिसृष्टी निर्माण करण्याची शक्ती ज्या विश्वामित्रांनी प्राप्त करून घेतली, त्या विश्वामित्रांना केवळ समाजाच्या भलेपणाची नव्हे, तर सर्वच विश्वाचे मित्र होण्याची ओढ होती. ध्यास होता.
क्रोध, कोप, शाप, उ:शाप, तपश्चर्या यांची ही कथा नाही, तर परिपूर्णतेचा ध्यास धरणार्या व ज्ञानशक्तीचे महत्त्व जाणणार्या एका तेजस्वी क्षात्रपुरुषाची ही महाकथा आहे.