Biodynamic Sheti Paddhati
गेल्या ९७ वर्षांपासून देश-विदेशात विकसित होत असलेल्या बायोडायनामिक शेती पद्धतीकडे शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न यामध्ये केला आहे.
जमिनीतील उर्वराशक्ती, सूक्ष्मजीवशक्ती ब्रह्मांडातील शक्तीद्वारे प्रेरित करून जमिनीची उत्पादकता व शेतमालाची गुणवत्ता अल्पावधीत सुधारता येते, हे सिद्ध झाले असून न्यूझीलंड, युरोपीय देश, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका यांच्यासह जगातील सुमारे ७० देशांतील शेतकऱ्यांना याची प्रचिती आल्याचे यात स्पष्ट केले आहे.
मृदा-विज्ञान (Soil Science), पीक-विज्ञान (Crop Science) व ब्रह्मांड-विज्ञान (Biodynamic/Cosmic Science) यांची योग्य सांगड घालून पिकनिहाय लागवडपद्धती शेतकऱ्यांसाठी सहजपणे उपलब्ध करून दिली आहे.
बायोडायनामिक शेती पद्धतीचे महत्त्व ओळखून विदर्भात नागपूर, अमरावती, वर्धा, मराठवाड्यात नांदेड, परभणी; पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सोलापूर, खानदेशात धुळे, जळगाव; तर कोकणात डहाणू परिसरातील अनेक शेतकरी याकडे वळले असल्याचे नमूद करून यातील काही संपर्क क्रमांक पुस्तकात दिले आहेत.
सेंद्रिय व बायोडायनामिक निविष्ठांचे उत्पादन व वापर याबद्दल पुस्तकात दिलेल्या माहितीचा उपयोग करून या निविष्ठा शेतातच तयार करून याआधारे पीकलागवड खर्च वाचवावा व पिकांचे उत्पादन वाढवावे, हाच मुख्य उद्देश आहे.
लेखकाविषयी माहिती : दिलीप देशमुख बारडकर हे नामवंत कीटकतज्ज्ञ असून हिंदुस्थान सिबा-गायगी इंडिया लिमिटेड उद्योगसंस्थेतून प्रांतीय संशोधन अधिकारी म्हणून ते निवृत्त झाले आहेत. रेसिड्यू फ्री अँड ऑरगॅनिक मिशन इंडिया फेडरेशन संस्थेचे सल्लागार तसेच महाराष्ट्र ऑरगॅनिक फार्मिंग फेडरेशन (मॉफ), पुणे या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांची विविध यशस्वी कृषिप्रयोगांवर आधारित मार्गदर्शनपर दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. जागतिक कृषी परिषद, २०१९मध्ये कृतिशील सहभागाबद्दल प्रशस्तिपत्र, त्याशिवाय शेतीमित्र, सिंचन मित्र, सेंद्रिय शेती शिल्पकार, स्व. शंकरराव किर्लोस्कर पारितोषिक, रेसिड्यू फ्री अँड ऑरगॅनिक मिशन इंडिया फेडरेशनचे प्रशस्तिपत्र अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.