Barik Barik Avaj Vadhat Chalalet By Sneha Avsarikar
बारीक बारीक आवाज वाढत चाललेत या स्नेहा अवसरीकर यांच्या पहिल्यावहिल्या कथासंग्रहात माणसामाणसांतल्या नात्यांचे विविध अविष्कार पाहायला मिळतात.कुठे काका-पुतण्यातल्या पारंपारिक नात्याच्या पलीकडे जाणारं, आपल्या पुतण्याबरोबरचं आत्मीय नातं जपणारे केशवकाका तर कुठे स्वतःच्या एकाकी आयुष्याचं प्रतिबिंब एका कबुतराच्या पिल्लात पाहून त्याच्याशी नातं जोडणाऱ्या वृंदाताई. कधी आपल्या दिवंगत सावत्र सासूचा केवळ फोटो पाहून तिच्याशी नातं जुळवलेली नंदी तर कधी स्वतःच्या अस्तित्वाचं भान आल्यावर स्वतःशीच नातं जोडणारी ‘मी’.नवऱ्याला आलेल्या त्याच्या मैत्रिणीच्या मेल्स वाचून हादरून गेलेली एखादी सुभद्रा अखेर कुठलीच नाती संपूर्णपणे आपली असणार नाहीत, हे समजून घेते तर एखादी रश्मी काही नाती निर्घृणपणे तोडावी लागतात, याचं भान ठेवून ईश्वरबरोबरच आपलं नातं मर्यादित अंतरावर राखण्याची शहाणीव दाखवते. एकीकडे युनियनद्वारे संपूर्ण भारतातल्या रेडिओ स्टेशन्सवर काम करणाऱ्या स्टाफशी नातं जोडू पाहणारी राधिका तर दुसरीकडे रेडिओतल्या आपल्या सहकाऱ्याबरोबर निर्माण झालेलं अबोल, अस्फुट नातं मनातच ठेवत त्याच्यापासून दूर होणारी इशा ….आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उमलणाऱ्या आणि मिटणाऱ्या…. अशा या तरल नात्यांच्या कथा वाचकांच्या मनात त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांच्या स्मृती जाग्या करतील.
सुबोध जावडेकर