Bangarwadi बनगरवाडी by vyankatesh madgulakar
बनगरवाडी. माणदेशातल्या एका 'लेंगरवाडी' नावाच्यावाडीवर बेतलेली वाडी. १९३८ साली माडगूळकर त्या गांवी होते तेव्हा तिथल्या अनुभवांचे वर्णन कादंबरीरूपात 'बनगरवाडी' या नावाने आपल्यासमोर येते. स्वतः माडगूळकरही त्याच भागातले. ९९साली माडगूळकरांनी कादंबरीत काही रेखाटने करावी असे ठरल्याने ते पुन्हा त्या वाडीत गेले. आणि ३८ सालच्या लेंगरवाडीत जवळजवळ साठ वर्षांनीही काही फरक पडला नसल्याचेच त्यांना जाणवले.
व्यंकटेश माडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून निर्माण झालेली बनगरवाडी वाचकाला अद्भूत अनुभव देते. बनगरवाडी या छोट्याच्या गावात भेटतात ते कारभारी, अंजी, दादू, आयाबू, आनंदा रामोशी, रामा, शेकू आणि त्याची उंच बायको. या प्रत्येकाची शरीरवैशिष्ट्ये जशी आहेत, तशी स्वभाववैशिष्ट्ये.
प्रत्येकाला एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. हे गाव माडगुळकर यांना जसं दिसलं, तसं ते त्यांनी चितारलं आहे. केवळ लेखणीतूनच नव्हे तर; कुंचल्यातूनही. माडगुळकर यांची रेखाचित्रं हे पुस्तकाच्या खास आकर्षणाचा एक भाग आहे.