बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपीला चौकशीसाठी नेताना तो पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला. दुबईहून आलेल्या या आरोपीला दहशतविरोधी पथकाने मोठ्या मुश्किलीने पकडल्याने त्याच्या पळून जाण्याविषयी पोलीस खात्यामध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ही बातमी म्हणजे वास्तव आहे, की या वास्तवाच्या मागे आणखी एक वास्तव जीभ छाटल्या अवस्थेत उभं आहे ? समर या वास्तवाचा शोध घेत निघतो आणि त्याच्या हाताला लागतं ‘बकऱ्याची बॉडी’ सारखं आभासाची त्वचा छिलून सोलून काढलेलं निकं सत्य. आतल्या मांसाइतकंच कोवळं. त्याला लागलेल्या रक्ताइतकं उष्ण आणि बाजूला पडलेल्या सुयाइतकं धारदार. या असं म्हणतात की, आपल्याला गवसलेलं सत्य सांगण्यासाठी लेखक लिहीत असतो. कथासंग्रहातली प्रत्येक कथा वाचताना वाटतं की, समरला दरवेळी सापडलेलं सत्य इतकं क्रूर आणि निक्षूर आहे की त्यात रक्तबंबाळ होणाऱ्या घुसमटून फाटणाऱ्या पात्रांना कागदावर उतरवताना त्याला हरघडी आपल्या लेखकपणाचं इमान पणाला लावावं लागलं असणार. हे इमान फक्त ‘सत्य तेच सांगेन’ इतः पर मर्यादित नाही तर सांगायच्या अनुभवाचं निकेपण डोळ्यात तेल घालून जपण्याची, त्याला हीणकसतेचा स्पर्श होऊ न देण्यासाठी झटण्याशी आणि अनुभव व्यक्त करण्यासाठी अचूक शब्द सापडावेत म्हणून केलेल्या धडपडीशीही त्याचा संबंध आहे. या संग्रहातल्या प्रत्येक कथेतल्या मानवी नातेसंबंधात, त्यांना घेरून राहिलेल्या सामाजिक व्यवस्थेत, तिच्या पोटात असलेल्या संघटनात्मक चळवळी आणि पोलीस यंत्रणेत, जात-वर्ग धर्म यांवर आधारित शोषण व्यवस्थेचे पृष्ठ आणि अंतःस्तर व्यक्त करण्यात अपार भरून राहिली आहे ती राजकीयता. राजकारणाचं प्रखर भान हे समरच्या कथांचं वैशिष्ट्य आहे. मग ते स्त्री-पुरुष नात्यातलं लैगिंकतेचं राजकारण असो वा सत्ताकारण आणि चळवळीमधलं अभिजनांचं वर्चस्ववादी राजकारण असो. त्यातले सगळे पैंतरे तो ठोक शब्दात उघड करतो. पुन्हा सत्ताकारण, लैंगिकता, प्रेम, द्वेष, असुया, सूडभावना हे सगळंच मानवी आयुष्यात सरमिसळ हाऊन येतं याची पक्की जाणीव लेखकाला आहे. त्यामुळेच तो मांडत असलेलं वास्तव अनेकदा आपल्या रूढ समजुतींना धक्का देतं, विस्मयचकित करतं आणि भेदरवून टाकतं. हे वास्तव मांडण्यासाठी केलेली शब्दांची निवड ही देखील मग लेखकाची एक राजकीय ‘मूव्ह’ ठरते. विकासाचे नारे देत झपाट्याने पुढे निघालेल्या जगाच्या लांबलचक सावलीत त्याहूनही कितीतरी मोठं जग दबक्या आवाजात हुंकार देत दाटीवाटीने पडून आहे. सेलिब्रेशनच्या ग्लोबल गदारोळात हे हुंदके माणूसपणाशी इमान राखलेल्या लेखक-कलावंतालाच फक्त ऐकू येऊ शकतात. समर हे हुंदके ऐकतोच, पण प्रस्थापित आळवत असलेल्या मुलायम सुरावटींच्या नोटेशनमध्ये त्यांना विद्रोहाचा सूर मिळवून देतो. अन्य वास्तववादी कथाकारांहून समरची कथा इथे वेगळी होते.
Payal Books
Bakryachi Body | बकर्याची बॉडी by Samar Khadas | समर खडस
Regular price
Rs. 250.00
Regular price
Rs. 280.00
Sale price
Rs. 250.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
