भारतीय संस्कृती ही उपासना, त्याग, संयम, शुचिता, सहिष्णुता,पूर्वजांचे स्मरण इ.चे मिश्रण असून,ती अंधारातून प्रकाशाकडे नेते. महामानव घडवते ही संस्कृती. दिवसेंदिवस हा विस्तार वाढतच जाणारा. देवर्षी नारद, वसिष्टमुनी, भगवान पतंजली, नाट्याचार्य भरतमुनी, वाल्मीकी, श्रीराम-श्रीकृष्ण, संत तुलसीदास, ज्ञानदेव-तुकाराम, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, कवी कालिदास इ. अविस्मरणीय थोर विभूतिंचे दर्शन आपल्याला ‘भारतीय संस्कृतीचे सर्जक’ मधून घडते. या सर्जकांचा अजूनही खूप मोठा विस्तार होऊ शकतो. आपल्या संस्कृतीतल्या प्रथा-परंपरा, वेद, उपनिषदे, भारतीय संस्कृतीची प्रतीके-(स्वस्तिक, कमळ, नंदी, शिविंलग, तुळस इ.), ऋषी-मुनी, महान विभूती व नवविधा भक्ती, वैदिक साहित्य यांचा विशेष अभ्यास करून लेखक द्वयींनी हे सृजनात्मक नवनीत आपल्यासमोर ठेवले आहे. ‘भारतीय संस्कृतीचे सर्जक’मधून ही ज्ञानरूपी कवाडे वाचनसमृद्धीकडे निश्चितच नेतात. म्हणूनच हा संस्कृतीसृजनाचा वारसा मौल्यवान ठरतो.