Athavni Mamanchya By Aun Shevte
काही नाती ही जन्मत:च मुरलेल्या स्वरूपात जुळली जातात. अगदी मुरांब्यासारखी! ही नाती ऊब, प्रेम किंवा मायेचा ओलावा अंगा-खांद्यावर घेऊनच आलेली असतात. विश्वासाचा भक्कम पाया असतो या नात्यांना!म्हणूनच कधी राग आणि गैरसमजुतीचं एखादं वादळ आलं आणि नात्यांचे धागे थोडे हेलकावले, तरी ते उसवत नाहीत किंवा तुटत नाहीत. कधी गोंजारून तर कधी फटकारुन ही नाती आयुष्य घडवणारे धडेही देत असतात. या नात्यांतून भरारी घ्यायला ऊर्जा मिळत असते आणि नंतर भरभरून कौतुकही मिळत असतं.आजोळची नाती ही अशी असतात, मग ती आईकडची असोत किंवा वडलांकडची! ‘आजोळचे दिवस’ या मालिकेत विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी याच नात्यांचे विविध पदर उलगडले आहेत.
मालिकेतील हे पुस्तक आहे मामासोबतच्या मैत्रीचं… नात्याचं ! मामा-भाचरांच्या नात्यांत एक वडिलकी आणि मैत्र याचं मिश्रण असतं. म्हणूनच हे नातं नेहमी तरूण राहतं. मामांच्या बहुपेडी आठवणी सांगत आहेत… बाळासाहेब थोरात, अमृता सुभाष, प्रदीप चंपानेरकर, किशोर मेढे, राजेंद्र मलोसे, प्राची रेगे, सुचिता घोरपडे आणि अश्विनी देसाई