Atharashe Sattavan Aani Marathi Kadambari अठराशे सत्तावन आणि मराठी कादंबरी by Pramod Munghate
Atharashe Sattavan Aani Marathi Kadambari अठराशे सत्तावन आणि मराठी कादंबरी by Pramod Munghate
अठराशे सत्तावनची घटना ही भारतीयांच्या इतिहासात स्वातंत्र्यसमर म्हणून नोंदली गेली आहे, तथापि काही इतिहासकारांच्या मते ते शिपायाचे बंड होते. डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी प्रस्तुत ग्रंथात या दोन्ही मतांची मांडणी केलेली असून त्याचा परामर्ष घेतलेला आहे. सुरुवातीच्या मराठी कादंबरीवर या दोन्ही मतांचा प्रभाव दिसून येतो. १८५७ सालीच मराठीतली पहिली कादंबरी ‘यमुनापर्यटन’ प्रकाशित झाली होती. त्याचवर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापनाही झाली. त्यापूर्वी महाराष्ट्रातील सुधारणावादींचे समाजप्रबोधनपर लेखन सुरू झालेले होते. या पार्श्वभूमीवर सत्तावनच्या घटनेवर आधारित मराठी कादंबरीवर ऐतिहासिक घटनेच्या प्रभावाऐवजी वैचारिक / सामाजिक प्रबोधनाचा परिणाम अधिक झालेला दिसतो. डॉ. मुनघाटे यांनी सत्तावनी मराठी कादंबरीची चिकित्सा सोदाहरण केलेली असून तिच्यामागच्या प्रेरणांचा व प्रत्यक्ष आविष्काराचा वेध घेतलेला आहे. ब्रिटिशांची सत्ता असल्यामुळे या कादंबरीकारांनी सत्तावनच्या बंडाचे, स्वातंत्र्यसमराचे वास्तवनिष्ठ चित्रण केलेले नाही, उलट त्याविषयीची कादंबरीकारांची भूमिका प्रतिकूलच होती असे त्यांचे निरीक्षण आहे. त्याचवेळी वैचारिक / सामाजिक उत्थानाच्या संदर्भात ते अनुकूल होते. राष्ट्रवादी, पुनरुज्जीवनवादी कादंबरीकारांनी राष्ट्रगौरवाला महत्त्व दिले. या दोन्ही प्रेरणा कादंबरी लेखनात कशा कार्यप्रवृत्त होत्या आणि त्यातूनच ऐतिहासिक कादंबरी व वैचारिक / सामाजिक कादंबरी हे दोन प्रवाह कसे निर्माण झाले, याविषयीचे या ग्रंथातले विवेचन महत्त्वाचे आहे.