विनय अपसिंगकर यांनी आपल्या अंतर्मनाच्या खिडकीतून स्वत:च्या आयुष्याकडे पाहिले आणि त्यांना जे आपले गतआयुष्य दिसले, ते इथे त्यांनी जसेच्या तसे वाचकांच्या समोर मांडले आहे.
निजामशाही, रझाकारांचे अत्याचार आणि तत्कालीन मराठवाडा डॉ. अपसिंगकरांच्या आत्मकथेतून अनुभवता येतो. या सर्व घटनांशी, काळाशी त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे संबंध आले.
त्या सगळ्या पडझडीतून पुढे येण्याचा त्यांचा प्रयत्न व जिद्द वाचताना आपलाही त्या काळाला स्पर्श होतो.
आत्मचरित्र लिहिताना आपल्या आयुष्यातील डाव्या बाजू लपविण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. अवहेलना, अपमान, तुरुंगवास अशा अनेक गोष्टी त्यांनी मनमोकळेपणाने सांगितल्या आहेत.
गुराखी, पोलिस, शिक्षक, प्राध्यापक असा त्यांच्या आयुष्याच्या स्थित्यंतराचा संघर्ष भावपूर्ण आहे.
डॉ. अपसिंगकर वृत्तीने कवी, त्यांचे नऊ कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. एका कवीच्या संवेदनशील वृत्तीतून साकारलेल्या आत्मचरित्राचे वाचक नक्की स्वागत करतील