एकाच अर्थाचे अनेक शब्द देणारा अमरकोष हा ग्रंथ म्हणजे संस्कृत वाङ्मयातील आश्चर्य आहे. अमरसिंह नावाच्या विद्वानाने हा कोश साधारणपणे इसवी सनाच्या चवथ्या शतकात रचला असावा. एका दंतकथेनुसार विक्रमादित्याच्या दरबारातील नऊ रत्नांपैकी अमरसिंह हा एक होता. मंगलाचरणावरून असे दिसते अमरसिंह हा बौद्ध होता. अमरसिंहच्या या कोषात तीन कांडे असून पंधराशे श्लोक आहेत. इतिहासकाळातही हा ग्रंथ लोकप्रिय झाला होता. अमरकोषावर, कोषाचे स्पष्टीकरण करणारे म्हणजेच टीका करणारे पन्नास ग्रंथ उपलब्ध आहेत. या ग्रंथात महेश्वरची टीका दिली असून महेश्वराने इतरांचे अनेक टीकाग्रंथ पाहून आपली टीका लिहिली आहे. अमरकोषाप्रमाणे संस्कृतमध्ये अनेक कोष आहेत. हेमचंद्राचा अभिधानचिंतामणी, अनेकार्थसंग्रह, नानाअर्थशब्दकोश मेदिनी असे अनेक कोष संस्कृतमध्ये आहेत. पण यापैकी अमरकोष हाच सर्वांत लोकप्रिय आहे. मेश्ववराच्या टीकेसह असलेला अमरकोष प्रो. किलहार्न यांनी संपादित केला व 1877 साली तत्कालीन मुंबई सरकारने तो छापला होता. त्या काळी या ग्रंथाच्या पंधरा हजार प्रती प्रसृत झाल्या होत्या. संस्कृत शिकणारे विद्यार्थी संपूर्ण अमरकोष तोंडपाठ करत असत. प्रो. किलहार्न स्वतःला "भट्ट किलहार्न" म्हणवून घेत असत. सध्या संस्कृतचा अभ्यासच कमी झाल्याकारणाने अमरकोष पहायलाही मिळत नाही. अमरकोषामध्ये शब्दांचे निरनिराळे वर्ग करून श्लोक दिले आहेत. या पुस्तकाच्या शेवटी सूची दिल्याकारणाने शब्द शोधून काढायला सोपे जाते. महेश्वराची जी टीका दिली आहे, तीही संस्कृतातच आहे. तेव्हा ज्यांना थोडेफार संस्कृत येते, त्यांनाच या कोशाचा उपयोग होणार हे उघड आहे; परंतु संस्कृत प्रतिशब्द शोधायला या कोशाचा उपयोग चांगला होईल. प्रत्येक शाळेच्या ग्रंथालयात असायलाच हवा असा हा कोष आहे.
Share
Choosing a selection results in a full page refresh.