PAYAL BOOKS
Akheris Nayanachi Goshta By Shyam Manohar अखेरीस नयनाची गोष्ट श्याम मनोहर
Couldn't load pickup availability
Akheris Nayanachi Goshta By Shyam Manohar अखेरीस नयनाची गोष्ट श्याम मनोहर
‘लिटररी नॉनसेन्स’ ही इंग्रजी संकल्पना मराठीत सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याला ‘वांङ्मयीन वेडेपणा’, ‘वाङ्मयीन निरर्थकता’, ‘वांङ्मयीन बालीशपणा’ अशा विविध अर्थच्छटा येतात, तरीही ‘लिटररी नॉनसेन्स’ या इंग्रजी संकल्पनेचे वजन त्यांस प्राप्त होत नाही. अशा लिखाणाला ‘लिटररी व्हॅल्यू’ म्हणजे ‘वांङ्मयीन मूल्य’ असतं. परतुं वरवर पाहता ते निरर्थक, वेडगळपणाचं वाटतं. खोल शिरल्याशिवाय अर्थाचं पाणी लागत नाही. श्माम मनोहर यांची एकूण लेखनप्रकृतीच यात मोडणारी आहे, त्यामुळे ‘लिटररी नॉनसेन्स’चा अर्थ सांगायचा तर तो ‘श्याम मनोहरांचे लिखाण’ असं सांगणं मराठीपुरतं तरी अधिक सयुक्तिक ठरेल. ‘अखेरीस नयनाची गोष्ट’ ही कादंबरी अशा वांङ्मयीन निरर्थकतेनं चाबडुब भरलेली आहे. ‘आजच्या राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक वास्तवाची उडवलेली खिल्ली किंवा त्यावर केलेलं तिरकस भाष्य’ असं या कादंबरीचं स्वरूप असलं तरी ही खिल्ली किंवा तिरकसपणा समजून घ्यायलाही आकलनाची एक बैठक लागते. म्हटले तर हा – ‘जगण्यासाठी कमीत कमी किती ज्ञान लागते’ – या प्रश्नाच्या उत्तराचा शोध आहे. ‘सिंहाने एखाद्याचा मेंदू खाल्ल्यावर तो फूड पॉयझनिंग होऊन मेला’ हे समजून घेण्यासाठी सध्या मेंदूत काय भरलं जात आहे याची जाणीव लागते. या लेखनाला ‘कादंबरी’ म्हणतानाही अनेकांची जीभ अडखळेल. कारण ‘कादंबरी’च्या अर्थाच्या कवेत ती येत नाही. लेखकाने आपल्या लेखनाला काय म्हणावे याचे स्वातंत्र्य त्याला असले पाहिजे. ओळीओळीत पेरलेला, टोकाच्या विक्षिप्तपणाचे पांघरुण घेऊन येणारा उपहास लक्षात ठेवत व्यक्तिरेखांच्या संवादांचे तुकडे जोडत बसणे ही मोठीच बौद्धिक कसरत या कादंबरीत आहे. ज्यांना आवडेल त्यांना ती अतिशय आवडेल. ज्यांना आवडणार नाही त्यांच्यासाठी ‘निवडणूक डिक्लेअर होते आणि समाजाचे रूपांतर जनतेत होते’ इतपत सोप्या उपहासाचीही सोय आहे. ‘अखेरीस नयनाची गोष्ट’च्या अखेरीस मात्र हा उपहास सर्वसामान्य वाचकांच्याही आवाक्यात येतो, सहज कळतो.
