मित्रावरुणी ऋषींच्या सामर्थ्याने मान-मानस स्वरूप कुंभातून प्रकटलेल्या अगस्त्यांनी विश्वकल्याणकारी कार्याने सप्तर्षित स्थान मिळविले. विश्वात दशदिशांना अगस्त्यऋषींची असंख्य पवित्र स्थाने आहेत. भारतात सर्वत्र भगवान अगस्त्यांची अठ्ठावीस स्थाने आहे.
इंद्र-मरुत संधी, समुद्रप्राशन, विंध्यगर्वहरण, कावेरी प्रकटन यांसह लोपामुद्रापति अगस्त्यांच्या प्रसिद्ध कथांतून; पर्यावरण, पर्जन्य, जल, कृषी आणि आरोग्यक्षेत्रातील संशोधक व व्यवस्थापक म्हणून; तसेच लोकप्रिय शांतिदूत, सुकृतपालक, कुशल संघटक, श्रेष्ठ योद्धा, शल्यचिकित्सक, अथर्वण, संगीततज्ज्ञ, कुलगुरू, देव, सिद्ध-योगी, ऋषी, मुनी स्वरूपातील अगस्त्यांचे व्यक्तिमत्त्व समोर येते. ऋषींच्या अलौकिक लोककल्याणकारी कार्याचे प्रातिनिधिक दर्शन ही कादंबरी घडविते.