Acharya Atre (Sanyukta Maharashtra Ani Seemaprashan) - आचार्य अत्रे (संयुक्त महाराष्ट्र आणि सीमाप्रश्न) BY KRUSHNA SHAHAPURKAR कृष्णा शहापूरकर
Acharya Atre (Sanyukta Maharashtra Ani Seemaprashan) - आचार्य अत्रे (संयुक्त महाराष्ट्र आणि सीमाप्रश्न) BY KRUSHNA SHAHAPURKAR कृष्णा शहापूरकर
सीमालढ्यामध्ये झालेली साराबंदी चळवळ. त्या चळवळीच्या समर्थनार्थ तुरुंगात डांबलेले हजारो कार्यकर्ते… त्यावेळचे मुख्यमंत्री बी. डी. जत्ती यांच्या सरकारने केलेले अत्याचार… मोरारजी देसाई पंतप्रधान असताना त्यांनी लोकसभेत जाहीर करून टाकले की, बेळगाव-कारवार सीमाप्रश्नाची फाइल कायमची बंद केलेली आहे. बेळगावच्या लढ्याचा मोरारजींनी निकाल लावून टाकल्यामुळे सांगलीचे एक लढाऊ नेते भाई ताराचंद शहा यांनी बेळगावातील हुतात्मा चौकात सुरू केलेले आमरण उपोषण, महाजन कमिशनचा खोटा अहवाल, हा सगळा इतिहास शहापूरकर यांनी संयमिक शब्दांत, पण प्रखरपणे या पुस्तकात मांडला आहे.
सीमा लढ्याचा संदर्भ ग्रंथ म्हणून या दस्तावेजाचा पुढच्या पिढ्यांना उपयोग होईल, इतका तपशील त्यात पानोपानी आहे. सीमा लढ्याला यश मिळाले नसले तरी, त्यांची पत्रकाराची व्यवसायनिष्ठा, मराठी भाषेची निष्ठा आणि सीमा भागातील चळवळीशी असलेली निष्ठा… या निष्ठेमध्ये कुठेही फरक पडलेला नाही. सीमा भागातील जनतेला भौगोलिकदृष्ट्या न्याय मिळाला नसला तरी, कृष्णा शहापूरकर यांनी सगळ्या घटना संदर्भासह प्रभावीपणे शब्दांकित करून सीमा भागातील मराठी जनतेला ऐतिहासिक न्याय दिलेला आहे एवढे मात्र निश्चित म्हणता येईल. मराठी भाषा, संयुक्त महाराष्ट्र, सीमा भागाचा महाराष्ट्रात समावेश व्हावा, ही तीव्र लोकेच्छा… याचे प्रतिनिधित्व या पुस्तकातील प्रत्येक पानावर ठळकपणे उमटले आहे. सीमा भागाला आज नेता उरला नसला तरी एका पत्रकाराने या वेदनेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे. सीमा भागातील मराठी माणूस आणि महाराष्ट्र या संदर्भ ग्रंथाचे स्वागत करील, अशी मला खात्री आहे.
– मधुकर भावे