Aai Samjun Ghetana आई समजून घेताना by Uttam Kambale उत्तम कांबळे
Aai Samjun Ghetana आई समजून घेताना by Uttam Kambale उत्तम कांबळे
पोटातील भूक शमवण्यासाठी आक्कानं जणू एक फॉर्म्युलाच तयार केला होता. माझ्यात शब्दांत पाणी फॉर्म्युला भूक जास्त लागली असेल आणि खाण्यासाठी अन्न कमी मिळत असेल तर जेवणापूर्वी भरपूर पाणी प्यावं…. जेवता जेवताही प्यावं आणि जेवणानंतरही प्यावं… सबब अन्नाऐवजी पाण्यानेच पोट भरतं… कमी अन्नात भागतं. उपासमारीच्या काळात आणि विशेषत: डायबेटीस पचवण्याच्या काळात मला हा फॉर्म्युला खूप उपयोगी पडला. डायबेटीसवाल्याला खूप कडाडून भूक लागते. भरपूर खावंसं वाटतं अशा वेळी पाण्याचा मारा करून भुकेची धग संपवता येते. काही काळासाठी तरी शांत होते. आक्कानं स्वतः हा फॉर्म्युला आयुष्यभर वापरला. जेव्हा खाण्याचे दिवस आले तेव्हा तिच्या रोगाचेही दिवस आले हातात हात घालून… शस्त्रक्रिया न करता हाइड्रोथेरपीचा वापर करून आणि तिला भरपूर पाणी प्यायला सांगून मुतखडा बाहेर पडतो का याचा प्रयोग सुरू झाला… खूपखूप पाणी पिताना ती कंटाळायची… एकसारखं पाणी पिऊन आतडी सुजतील असं म्हणायची…. पण आम्ही तिला प्रोत्साहन द्यायचो… बायको प्रोत्साहन द्यायची… नातवंडं प्रोत्साहन द्यायची… आक्का पी पाणी… आत्या पाणी प्या… आजी पी पाणी… भरपूर पी… आणखी पी… पाणी फॉर्म्युला म्हातारपणी आपल्यावर उलटेल असं तिला कधी वाटलं नसावं…