वीरधवल (संक्षिप्त आवृत्ती) (नाथमाधव) द्वारकानाथ माधव पितळे (संक्षिप्तीकरण : डॉ. कल्याणी हर्डीकर) Veerdhaval Darvakanath Pitale
कुमारवयीन हुशार, बुद्धिमान मुले मनात आणले तर आपल्या राष्ट्रासाठी काय करू शकतात, कशी लढू शकतात, येणाऱ्या संकटांवर न डगमगता उत्तम संस्कारांमुळे कशी मात करू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे वीरधवलचे व्यक्तिचित्रण आहे. एकशे पाच वर्षांपूर्वी नाथमाधवांनी हा वीरधवल रंगवला आहे.
वीरधवलच्या आयुष्यातही अनेक अद्भुतरम्य प्रसंग आहेत. तो पोरका आहे. नियती, चण्डवर्म्यासारख्या बलाढ्य शत्रूशी त्याची जन्मतःच गाठ घालून देते. पण, कीर्तीवर्म्याचे पिशाच्च वीरधवलची कशी पाठराखण करते आणि तो आपल्या नियोजित कार्यात कसा यशस्वी होतो, हे मुळातूनच वाचायला हवे.
मूळ कादंबरीचा संक्षेप कथानकाचा मूळ प्रवाह कायम ठेवूनच केला आहे. नाथमाधवांचीच भाषा वापरली आहे. मुलांची साहसी वृत्ती वाढावी, त्यांची अद्भुताची आवडही भागवली जावी. दुष्कृत्यांचा आणि दुर्जनांचा शेवट दुःखाचा होतो आणि सुजनांचा शेवट कितीही कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले तरी सुखाचा होतो, हे त्यांच्या मनावर नोंदवले जावे, हा उद्देश ठेवून नाथमाधवांनी जे लिहिले, तेच मुलांपुढे पोचवायचा प्रयत्न केला आहे. मानवी स्वभावांच्या परिपोषाला प्राधान्य दिले आहे आणि अतिरंजित अद्भुताला फाटा दिला आहे.