आनंदी गोपाळ (संक्षिप्त आवृत्ती) श्रीकृष्ण जनार्दन जोशी (संक्षिप्तीकरण : आसावरी काकडे) Anandi Gopal
‘आनंदी अमेरिकेत जाऊन डॉक्टर झाली’ ही या कादंबरीची कथा! एवढंसं सांगायला एवढी पानं? एकविसाव्या शतकाच्या अतिप्रगत कालखंडातल्या मुलांना नक्कीच असा प्रश्न पडेल.
पण ही कादंबरी वाचताना लक्षात येईल की ही कथा जेवढी आनंदी आणि गोपाळराव जोशी यांच्या, आज अविश्वसनीय वाटू शकेल अशा, संघर्षमय आयुष्याची कथा आहे तेवढीच ती त्या काळाची, त्या काळातल्या आयुष्य जखडून ठेवणाऱ्या रूढींची, रूढींना कवटाळून बसलेल्या समाजाचीही कथा आहे.
1874 साल आहे. नऊ वर्षांच्या आनंदीच्या लग्नाची खटपट सुरू आहे, पंचवीस वर्षांच्या गोपाळरावांशी तिचं घाईघाईत लग्न उरकलं गेलंय. इथून या कादंबरीची सुरुवात होते आणि डॉक्टर होऊन अमेरिकेहून परतल्यावर क्षयासारख्या आजारानं वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी - 1887 साली तिचा मृत्यू झाला, इथं ती संपते. या तेरा वर्षांत ही कथा कल्याण, ठाणे, अलिबाग, कोल्हापूर, मुंबई, भूज, कलकत्ता, अमेरिकेतील रोसेल गाव, फिलाडेल्फिया, बोस्टन आणि परत मुंबई, पुणे या गावांमधून, तिथं भेटणाऱ्या माणसांच्या वृत्ती-प्रवृत्तींमधून उलगडत जाते.
स्थल-कालाच्या या पटावर ‘आनंदी गोपाळ’ हा पूर्ण चित्रपट डोळ्यापुढं साकारावा इतकी या कादंबरीची भाषा प्रत्ययकारी, उत्कट आणि त्या कालखंडाला साजेशी आहे. वाचताना यातल्या व्यक्तिरेखा जिवंत होऊन मनाचा ठाव घेतात. ऐतिहासिक तपशील ललित कादंबरीच्या रूपात आणताना चालू शकतील असे थोडेफार कलात्मक बदल लेखकाने केलेले आहेत. ही कादंबरी संक्षिप्त रूपात आणताना स्वाभाविकपणे यातील बराच मजकूर गाळावा लागला तेव्हा, एखादं जमून गेलेलं पोर्ट्रेट समोर ठेवून आपण त्याचं रेखाचित्र बनवतोय असं वाटत राहिलं! तरी या संक्षिप्त रूपातही कादंबरीचे मूळ स्वरूप, भाषाशैली, त्यातली उत्कटता... सर्व आहे तसं राखत पूर्ण कथानक आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातून मूळ कादंबरी, आनंदीबाई, गोपाळराव जोशी यांचं चरित्र आणि त्या काळचा इतिहास वाचण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल.