हत्या (संक्षिप्त आवृत्ती) श्रीपाद नारायण पेंडसे (संक्षिप्तीकरण : डॉ. ज्योत्स्ना आफळे) Hatya Jyotsana Aphale
आपल्या कादंबऱ्यांमधून प्रादेशिकतेचे वैशिष्ट्य जपणाऱ्या श्री.ना.पेंडसे यांच्या ‘हत्या’ या कादंबरीतून कोकणातील हर्णे-दापोलीचा परिसर चित्रित झाला आहे. कादंबरीचा नायक आहे हत्या. आप्तजनांकडून आबाळ झालेला, परिस्थितीने अव्हेरलेला आणि समाजाच्या प्रचलित घडणीचे भक्ष्य बनलेला हत्या, त्याची सुखदुःखं, त्याची व्यथा पेंडसे यांनी ‘हत्या’मधून रंगविली आहे. कोकणातल्या मातीत वाढलेली माणसं, त्यांची जीवनदृष्टी, त्यांची विचारसरणी, तिथला निसर्ग यांचं प्रत्ययकारी दर्शन या कादंबरीतून घडते.
हत्या उर्फ हनुमंत करोंदकर या किशोरवयीन मुलाची जीवनकहाणी आपल्याला अंतर्मुख करते. ऑफिसमध्ये पैशाचा गैरव्यवहार केल्याचा ठपका येऊन हत्याचे वडील तुरुंगात जातात. त्याच्या कुटुंबाची दुर्दशा होते. हत्याचे बालमन अकाली प्रौढ बनते. प्रसंगी हॉटेलात कपबश्या विसळण्याचे काम तो धरतो. तिथे तो भुत्याच्या संगतीत येतो आणि त्याच्या हातून एक प्रमाद घडतो. त्यामुळे त्याचे अवघे भावविश्व उद्ध्वस्त होते. हत्याच्या जीवनप्रवासाबरोबर कोकणातील समाजजीवन, रुढीपरंपरा, कोकणी माणसाच्या वृत्ती-प्रवृत्तींचेही दर्शन घडते. आयुष्याचे टक्केटोणपे खात जगताना हत्याची होणारी फरफट लेखकाने दाखवली आहे. आईचे प्रेम आणि आजोबांचे संस्कार त्याला रोखू शकत नाहीत. कादंबरीचा शेवट हत्याच्या पळून जाण्याने होतो.