अलेक्झांडर द ग्रेट - विश्वसाम्राज्य उभं करणारा जगज्जेता by Kriti Prachure
कित्येक युद्धांचा अनुभव असलेल्या अलेक्झांडच्या साहसी सैन्यापुढे पुरूच्या सैन्याचा निभाव लागत नव्हता. पुरूला पराभव समोर दिसत असूनही तो चिवटपणे झुंज देत होता. त्याची जिद्द आणि धाडस पाहून अलेक्झाडंर प्रचंड प्रभावित झाला आणि त्याला शरण येण्याचा निरोप पाठवला. निरोप घेऊन जाणार्या एका तुकडीला पुरूने ठार करायचा प्रयत्न करूनही अलेक्झांडरनं युद्ध थांबवण्यासाठी पुरूचं मन वळवलं. खरंतर अलेक्झांडरचा विजय झाला होता. पुरूला ठार करून एका क्षणात युद्ध थांबवणं अलेक्झांडरला सहज शक्य होतं, पण या भारतीय राजाच्या शौयानं त्याचं मन जिंकलं होतं. म्हणूनच अनेक दिवसांची मेहनत, प्रचंड नियोजन, शेकडो सैनिकांचे मृत्यू आणि घनघोर लढाईनंतर मिळवलेलं पुरूचं राज्य अलेक्झांडरनं त्याला परत देऊन टाकलं! इतकंच नाही, तर आजूबाजूची आणखी जमीनही त्यात भर घालून दिली!
आज आपण अलेक्झांडरला ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून ओळखतो. पण त्याचं चरित्र वाचताना अलेक्झांडर हे काळाच्या पुढे जाणारं रसायन असल्याचा पदोपदी प्रत्यय येतो. जितका क्रूर तितका उदार, जितका शिस्तबद्ध तितकाच प्रयोगशील, जितका विजिगीषू तितकाच तत्त्वज्ञानाचं आकर्षण असलेला.... अलेक्झांडर चिमटीत पकडता येत नाही. त्याला कुठल्याही चौकटीत बंद करता येत नाही. किंबहुना त्याचं सतत चौकटी मोडत राहणंच वेध लावतं. म्हणूनच आज हजारो वर्षांनतरही त्याच्याबद्दल होणारी संशोधनं आणि टीकाही कायम आहे. तो अजूनही लहान-मोठ्यांच्या उत्सुकतेला आव्हान देतोच आहे!